पुणे : मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून, राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात पावसाने थैमान घातले होते. अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर पहाटेपासून पुण्यासह परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत.
हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह परिसरात पावसाने हजेरी लावली. तर कालपासून औरंगाबादसह, जालना, परभणी, बीड या भागात पावसाचा जोर ओसरला आहे. काल संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नव्हते. मात्र, आज सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले आहे. दरम्यान, आज विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.