मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. यांनंतर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे सांगत यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचे काय गुण आहेत? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्यांच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचं विघ्न दूर झालं आहे. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकट आलं होतं. पण आता ते नाहीय. हे सरकार चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं, त्यांना डिवचू नका सगळं आहे त्यांच्याकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.