पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल, असे गायकवाड यांनी ट्विट करत म्हटले आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुले असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे, अशी माहिती देत वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.