पुणे : ”भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकीक आहे. मागील वेळेत चंद्रकांतदादा कसे निवडून आले तचे सर्वांना माहीत आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला”, असे पहिली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, ”धुळे-नंदूरबारमधील निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. ते निर्वाचित होते, त्यांच्या पाठीमागे मोठा वर्ग पूर्वीपासूनच होता. तो खरा विजय नाही. आम्ही गेली वर्षभर काम करून दाखवलं आहे. नागपुरची जागा ही काॅंग्रेसला मिळाली, ती आतापर्यंत कधील मिळाली नव्हती. राज्यातील निकाल हा महाविकास आघाडीचाच विजय आहे. लोकांनी महाविकास आघाडीला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदार संघात १ लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत, तर भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मत मिळाली. विजयासाठी १ लाख १५ हजार मतांचा कोटा होतो, तो अरुण लाड यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.