शिंदे गट आणि भाजप मध्ये धुसपूस; वादाची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली दखल

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील संघर्षाचा दुसरा अंक बुधवारी महाराष्ट्राने पाहिला. मंगळवारी शिंदेसेनेच्या ‘हितचिंतका’ने फडणवीसांचा ‘पाणउतारा’ करणारी जाहिरात प्रकाशित केल्याने भाजपमध्ये मोठा ‘भडका’ उडाला होता. त्याची भरपाई करण्यासाठी शिंदेसेनेने बुधवारी ‘सुधारित’ जाहिरात प्रकाशित करून ‘हम साथ साथ’चा संदेश दिला. मात्र त्याने भाजपचा राग शांत झाला नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे तडजोडीची भाषा करत असताना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट शिंदेंबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात तेल टाकले. मग शिंदेसेनेच्या नेत्यांनीही भाजपला त्यांची ‘औकात’ दाखवली. यातून वाद वाढतच गेला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशीही या वादावर काहीही भाष्य केले नाही. मात्र शिंदेंच्या कार्यक्रमावर ‘बहिष्कारा’ची भूमिका कायम ठेवली. आता हा वाद ‘दिल्ली दरबारी’ गेला असून भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मुंबईत येऊन त्याची सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.

खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाचा आधार घेत शिवसेनेने शिंदेचे नेतृत्व फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाराज असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशीही शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार कायम ठेवला. मंगळवारी त्यांनी कोल्हापूरला जाणे टाळले होते. बुधवारी एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापदन दिनाचा कार्यक्रम मुंबईत होता. तिथे शिंदे व फडणवीस हे दोघेही प्रमुख पाहुणे होते. पण फडणवीस यांनी तिथे जाणे टाळले.

फडणवीस यांचा कान दुखत असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बाहेरगावचे सर्व दौरे रद्द केले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथिगृह येथे तीन बैठका घेतल्या. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एसटीच्या कार्यक्रमालाही ते हजर होते. या कार्यक्रमाला फडणवीस तर गैरहजर होतेच, पण भाजपचे नेते व विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे भाजपनेच आता शिंदेंवर बहिष्कार टाकला काय, अशी चर्चा होती.

आम्ही सर्वस्व पणाला लावून उठावच केला नसता तर हे सरकार आले नसते. जर कुणाला वाटत असेल हे वरचढ होतायत तो गैरसमज आहे. अटलजींचे सरकार एका मताने पडले होते. त्यामुळे काही बोलून कुणाला नाराज करू नका. – आमदार संजय शिरसाट, प्रवक्ते शिंदेसेना

कालची जाहिरात आमची नव्हती, पण आजची आहे. आता वादावर पडदा पडला अाहे. आता २०२४ मध्ये जास्त खासदार निवडून आणण्याचे आमचे ध्येय आहे. खा. बोंडे व इतरांनी आता सामंजस्याची भूमिका घ्यावी. – शंभूराज देसाई, कॅबिनेट मंत्री, शिंदेसेना

एकनाथ शिंदे वाघ आहेत. आमच्या ५० वाघांमुळेच भाजपला मंत्रिमंडळात स्थान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून तुम्ही मोठे झालात. शिवसेना सोबत नसती तर तुमची काय औकात होती, हे लक्षात ठेवा. – आमदार संजय गायकवाड, शिंदेसेना

कालच्या जाहिरातीमुळे काही लोकांची मने दुखावली. त्यातून काही प्रतिक्रिया आल्या. खरे तर ती जाहिरात शिवसेनेची नव्हती. तरीही त्यांनी नवीन जाहिरात छापून चूक दुरुस्त केली. त्यामुळे आता हा विषय संपला आहे. – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप

Leave A Reply

Your email address will not be published.