पिंपरी : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारी अर्जाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलीस निरीक्षकास तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. याबाबत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आदेश दिले आहेत.
वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे असे संलग्न करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमआयडीसी भोसरीच्या पट्ट्यामध्ये माथाडी संघटनांमध्ये धुसफूस सुरू आहे. दरम्यान, काही माथाडी संघटना कंपन्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याच्या तक्रारीदेखील पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी याकडे दुर्लक्ष केले.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आक्रमक पवित्रा घेत गवारे यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वाकड वाहतूक विभाग येथील पोलीस कर्मचारी सचिन खोपकर हा खासगी बस चालकांकडून हप्ते वसूल करीत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त यांना प्राप्त झाली. या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्यांना काही प्रमाणात तथ्य आढळून आले. त्यामुळे खोपकर याला देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.