पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील पुर्णानगर – शिवतेजनगर शिवसेना शाखेतील शिवसैनिकांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या फोटोला काळं फासलं, तसेच आजी-माजी खासदारांना गद्दार म्हणून उपाधि देत त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भोसरी विधानसभा संघटक ऋषीकेश जाधव, शिवसैनिक बापू ढेकळे, श्रीकांत करोले, प्रणित हुमणे, सत्यवान हुलसुरे, सुनिल शिंदे, शिवाजी खराटे आदीजण उपस्थित होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसुन आजी-माजी खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांतून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. यापुर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा जाहीर निषेध पिंपरीतील डाॅ. आंबेडकर चौकात व्यक्त केला होता. हे गद्दार खासदार शिवसेनेची पणवती असून ते जिकडे जातील तो पक्ष संपतो, अशी टीका शहरप्रमुख अॅड सचिन भोसले यांनी केली होती. नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत निष्ठावान शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. त्यात गद्दारी करुन गेलेल्यांना त्यांची जागा येत्या निवडणूकीत दाखवून द्या, असंही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, पुर्णानगर -शिवतेजनगर शिवसेना शाखेतील शिवसैनिकांनी आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करीत गद्दार, फुटीर असलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या फ्लेक्सवरील फोटोला काळं फासून दोघांचा जाहीर निषेध व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश मोरे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. यापुढील निवडणुकीत आजी-माजी खासदारांना त्यांची दाखवून देण्याचा निर्धार याप्रसंगी शिवसैनिकांनी केला आहे.