मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. यानंतर आता याबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे.
पक्षचिन्हाच्या हक्काबाबत 12 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती.