नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे ला घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला 4 तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा इशारा कुठेही कामात येणार नाही. काँग्रेस धार्मिक वादात पडू इच्छित नाही, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार असल्याचं पटोले म्हणाले. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी जरी चार तारखेपासून मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यासाठी शासन सक्षम असून राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.