पिंपरी : शहरातील भाजप मध्ये गेलेले काही नेते भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. त्यांची राष्ट्रवादी मध्ये येण्याची इच्छा असून लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल; असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात स्फोट केला आहे.
भाजपामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना असे वाटले होते की, भाजपा सत्तेत येईल तेव्हा त्यांचे ऐकले जाईल. आता त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आहे, कारण त्यांची कामं झाली नाहीत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा आहे. त्यांचे लवकरच स्वागत करण्यात येईल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. अजितदादा पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी भाजपात जाऊन राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली महापालिका खेचून आणली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे नेमकं कोण राष्ट्रवादीत येणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.