पिंपरी : आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अँटी करप्शन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असून ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ हे उद्घोषक वाक्य देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे थोडी नैतिकता शिल्लक असेल तर भाजपा नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा. तसेच घडलेल्या प्रकाराची सर्वांगीण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
ताब्यात घेतलेले अधिकारी पदाधिकारी यांच्यामागे नेमका कुणाचा आधार होता हे शोधणे गरजेचे असून याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात. चौकशीअंती लवकरच सत्य बाहेर येईल; घोषणांचा पाऊस पाडून सत्तेत आलेल्या भाजपाने पदाचा गैरवापर करून शहरातील जनतेच्या पैशाची जी लूट चालवली होती याचा पुरावा आज शहरातील जनतेला मिळाला आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा या लोकांनी घात केल्याचे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे.
खोटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतलेल्या या लोकांमुळे सर्व बाजूंनी शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून, धाडस दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व लाचलुचपत विभागाचे मी कौतुक करतो असेही आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.