मुंबई : जिलेटीन गाडी, वाझे प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणारे NIAचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरु होती. मात्र शुक्ला यांच्या अचानक बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात असून, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केलाय.
NIAचे प्रमुख अनिल शुक्ला यांची बंदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीय. अनिल शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना 6 वर्षे पूर्ण झाली होती. या संपूर्ण प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली होणार होती. पण त्यांना काही काळ मुदतवाढ दिली गेली होती. पण आता त्यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
NIA चे प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यामागे कारण काय? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. या बदलीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय. शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं हे केंद्राला मान्य नसावं. परमबीर सिंग माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत, याची आज खात्री झाली, अशा शब्दात मुश्रीफ यांनी अनिल शुक्ला यांच्या बदलीबाबत संशय व्यक्त करत भाजपवर टीका केलीय.