चिखली खून प्रकरणात काही तासातच दोघांना अटक

0

पिंपरी : पाठलाग करुन, डोक्यात वार करुन, तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी काही तासात अटक केली. जुन्य भांडणाच्या कारणावरून हा खून केला असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.

कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर (38, रा. परशुराम चौक, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आकाश उर्फ मकसूद विजय जाधव (रा. रामनगर, चिंचवड), शिवराज अविनाश ननावरे (रा. रुपीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कानिफनाथ हे मंडप व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. त्यावेळी साने चौकाजवळ आल्यानंतर मारेकर-यांनी कानिफनाथ यांचा धावत पाठलाग केला. साने कॉलनी रोडवर आल्यानंतर मारेकऱ्याने कानिफनाथ यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून आरोपींनी कानिफनाथ यांच्या डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.

चिखली पोलिसांनी पथके तयार करून आरोपींच्या शोधत रवाना केली. त्यातील एका पथकाला माहिती मिळाली की, रक्ताने माखलेले धारदार हत्यार घेऊन दोघेजण यादवनगर येथे एका पत्र्याच्या शेड मध्ये बसले आहेत. त्यांच्या कपड्यांवर देखील रक्ताचे डाग आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून घटना घडल्यानंतर दोन तासात आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींचा आणि मयत कानिफनाथ यांचा जुना वाद होता. तसेच साने कॉलनी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या तत्कालीन वादातून आरोपींनी त्यांचा पाठलाग करून खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.