पिंपरी : तांत्रिक पद्धतीचा वापर करुन महिलेने पतीचे विवाहबाह्य संबंध शोधून काढले आहेत. पत्नीने यासाठी जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली. पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरिफ मांजरा नामक एका उद्योजकाचे विवाहबाह्य संबंध होते. तो पत्नीला खोटं बोलून अनेकदा त्याच्या प्रेयसीला भेटायचा. याची कुणकुण पत्नीला लागली. पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडण्यासाठी पत्नीनं शक्कल लढवली. व्यावसायिक बैठकी, कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात जात असल्याचे आरीफ पत्नीला भासवायचा. प्रत्यक्षात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असल्याचा पत्नीला संशय येत होता.
आरीफच्या वागण्यातील बदल ही तिला खटकू लागला. त्यामुळे पतीचे ‘कार’नामे समोर आणायचा निर्धार पत्नीने केला. यासाठी पत्नीने जीपीएसचा आधार घ्यायचं ठरवलं. कोणाला कानोकान खबर न लागू देता पत्नीने जीपीएसचे किट पतीच्या फॉर्च्युनर ‘कार’ला बसवले. जीपीएस ट्रॅकरनुसार कारचे लोकेशन अनेकदा पुण्यातच आढळू लागले. आरीफची कार 21 ऑक्टोबर 2020 ला देखील पुण्यातच दिसून आली.
बावधन येथील ‘व्हिव्हा ईन हॉटेल’चे लोकेशन आढळून आले. पत्नीने तातडीनं गुगलवर सर्च करून हॉटेलचा नंबर मिळविला आणि चौकशी केली. आरिफ मांजरा नावाची व्यक्ती हॉटेलमध्ये आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्याने ‘हो’ असं उत्तर दिलं. मग त्यांच्यासोबत कोण आहे? असा पुढील प्रश्न केला असता हॉटेलमधून महिलेचं नाव सांगण्यात आलं. ते नाव स्वतः पत्नीचं होतं. पण पत्नीने ते नाव तर माझं आहे असं सांगितलं.
पत्नीच्या लक्षात आलं की तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. तरी तिने प्रत्यक्षात हॉटेलमध्ये येऊन पहायचं ठरवलं. त्यानंतर पत्नी नोव्हेंबर 2020मध्ये गुजरात वरून पुण्यात त्या हॉटेलमध्ये आली. तिथं अधिकची माहिती मिळविण्याचे तिने प्रयत्न केले असता पतीने त्या महिलेचे म्हणून तिच्या आधारकार्डची झेरॉक्स दिली होती. मग 21 ऑक्टोबर 2020चे सीसीटीव्ही तपासले असता त्या दिवशी हॉटेलमध्ये आलेली महिला दिसून आली. ही महिला चंदीगड येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा 1 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस याचा तपास करत आहेत.