पुणे : अचानक पिस्तुलातून गोळी उडाल्याने ती सोबत असलेल्या चुलत भावाच्या हाताला लागली. यामध्ये चुलत भाऊ जखमी झाला आहे. ही घटना वारजे माळवाडी येथील हैदराबाद बिर्याणी समोर शनिवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला.
कोमलकुमार पाटील (३२, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ कोमलकुमार पाटील (३२) हे दोघे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी बालेवाडी येथे आले होते. तेथून ते परत घरी जात होते. वाटेत ते वारजे माळवाडी येथील हैदराबाद बिर्याणी येथे थांबले होते. तेथून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परत आपल्या गावी जाण्यास निघाले. पाटील यांच्याकडील बॅगेत परवाना असलेले पिस्तुल होते. ते बोलेरो महिद्र या गाडीत चढत असताना त्यांच्या हातातील हँड बॅग रस्त्यावर पडली आणि त्यातील पिस्तुलातून अचानक गोळी उडाली.
ती त्यांच्याबरोबर असलेल्या कोमलकुमार यांच्या डाव्या हातात घुसली त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. हॉस्पिटलकडून याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. तेथील हॉटेल व्यावसायिक व इतरांकडे चौकशी केली. निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोळी उडाली ते पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे व रिकामे कार्टेज जप्त केले आहे.
घटनास्थळी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी तसेच सुनिल पवार यांनी भेट दिली.