पिंपरी : युट्युबवर सोन साखळी चोरीचे व्हिडिओ बघून चोऱ्या करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
सौरभ अरुण यादव याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा एका नामांकित फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. नुकताच झालेला प्रेमविवाह आणि बायकोची हौस पुरवण्यासाठी त्याला पगारावर भागत नव्हतं.
पत्नीच्या प्रेमासाठी त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. युट्युबवर व्हिडिओ पाहून त्याने धडे घेतले. सहा महिन्यांपासून तो चोऱ्या करत आहे. आत्तापर्यंत सहा गुन्हे केल्याचं उघडकिस आले आहे. त्याच्याकडून सहा लाखांचे १२ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, संतोष पाटील, सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.