मुंबई : मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. एवढेच नव्हे तर मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. भारतात जेवढा प्रकाश पडला आहे, तो मोदींमुळेच पडला आहे. तरीही विजय माल्ल्या कसे काय पळून गेले? अदानींना मोदी का वाचवत आहेत?, असा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपला चिमटे काढले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही बाजारबुणगे मोदींवर टीका करत आहेत. हे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक उत्तर दिले.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आम्ही मोदींना काहीही म्हणालेलो नाही. मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. संध्याकाळचे शीतल चांदणे मोदींमुळेच पडते. मोदींमुळेच नद्या वाहतात. मोदींमुळेच समुद्र उसळतो. अशा मोदींनी सर्वशक्तिमान लोकांवरही कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. मोदी एवढे शक्तिमान असूनही नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी परदेशात कसे काय पळून गेले? अदानींना का वाचवले जात आहे? आमच्या एवढ्याच प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यावी.
आपल्या सरकारमध्ये काही बाजार बुणगे आहेत. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर कठोर कारवाई कधी करणार?, असा सवालही संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले आहे. त्यात भाजप आमदार राहुल कुल, मंंत्री दादा भुसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये यावर करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांना उद्देशून संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार” .देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय ?
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (तालुका- दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान 500 कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळातील दादा भुसे यांनी ‘गिरणा अॅग्रो’ नावाने 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.
किरीट सोमय्या यांच्यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे. या सर्व बेकायदेशीर प्रकरणांबाबत ‘पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी.