…मग पिंपरी पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षाला घोटाळ्यामध्येच पकडले होते ना; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत भाजपला सवाल
पिंपरी : महापालिकेत घोटाळा, मुंबई महापालिकेत घोटाळा म्हणता मग पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला अँन्टीकरप्शनने पकडले ते काय होते? घोटाळ्यातच पडकले होते ना, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याची टीका केली. तसेच मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी खरेदी केलेल्या मालमत्तांवरुन टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले. महापालिकेत घोटाळा, मुंबई महापालिकेत घोटाळा मग पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षाला घोटाळ्यामध्येच पकडलेच होते ना, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला तसेच मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगले काम केले. त्यांची सर्वांनी कौतुक केल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भाजपचे तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह कर्मचा-यांना एसीबीने 18 ऑगस्ट 2021 रोजी महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे (मुख्य लिपिक), विजय चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद कांबळे, (पद शिपाई) यांना अटक झाली होती. आठ दिवस पोलीस, न्यायालयीन कोठडीतही होते.