मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) म्हटले होते की, आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ मैदानात खेळताना दिसून येणार आहेत. तसेच फ्रँचाइजीसोबत ५० खेळाडू जोडले जाणार आहेत. त्यामुळे ते दोन नवीन संघ कुठले असतील हे जाणून घेण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यापैकी एक संघ अहमदाबादचा असेल हे जवळपास निश्चित आहे. परंतु दुसरा संघ कुठला असेल? याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने भविष्यवाणी केली आहे.
अनेकांचे असे म्हणणे आहे की, तो दुसरा संघ पुणे असेल. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा याने म्हटले की, “इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत १० वा संघ पुणे नव्हे तर उत्तर प्रदेशचा असेल. ज्याचे सामने लखनऊच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात.”
आकाश चोपडाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “दोन नवीन संघाचा समावेश केला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही ४ खेळाडूंना रिटेन करू शकणार आहात. यामध्ये तीनपेक्षा अधिक भारतीय खेळाडू आणि दोनपेक्षा अधिक परदेशी खेळाडूंना तुम्ही रिटेन करू शकणार नाही. आयपीएल सुरू होण्याची बातमी आली आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आपण सर्वच खूप उत्सुक आहोत. यात मुख्य बाब म्हणजे ते संघ कुठले असतील? एक संघ तर निश्चित आहे, अहमदाबाद संघ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळणार.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला वाटते की, दुसरा संघ लखनऊ असेल. मी असेही ऐकले आहे की, तो संघ पुणे देखील असू शकतो. परंतु माझ्या मते तो १० वा संघ लखनऊ असेल. या आयपीएल स्पर्धेत ४ खेळाडूंना रीटेन करता येणार आहे. याचा अर्थ असा की, जो पहिला खेळाडू रीटेन केला जाईल तो १५ कोटींचा असेल. तसेच दुसरा खेळाडू ११ आणि तिसरा खेळाडू ७ कोटींचा असेल. चौथ्या खेळाडूला किती पैसे मिळतील याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही.”