नवी दिल्ली: सर्वसामान्य माणसासमोरमुलांचे शिक्षण आणि मुलांचे लग्न या दोन गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांची चिंता नेहमीच असते. त्यातच दिवसेंदिवस खर्चिक होत जाणाऱ्या शिक्षणामुळे पालकांना आपल्या मुलांच्या शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणाची नेहमीच काळजी वाटत असते. अशावेळी जर उत्पन्नच मर्यादित असेल तर हे सर्व खर्च डोंगराएवढे वाटत असतात. यातून मार्ग कसा काढायचा याच विवंचनेत अनेकजण असतात. पोस्ट ऑफिसची ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजना’ ही यासाठी उपयुक्त ठरू शकते.
रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स स्कीमअंतर्गत ही योजना येते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत छोटीशी गुंतवणूक करून २० वर्षात १४ लाख रुपयांचा लाभ मिळू शकतात. मुलं लहान असतील तेव्हाच या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास योग्य वेळी त्याचा चांगलाच लाभ मिळू शकतो.
मुलं लहान असतानाच तुम्ही जर पोस्टाच्या ग्राम सुमंगल योजनेत गुंतवणूक करण्यास सुरूवात केली तर मुले २० वर्षांची होतील तेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी ही रक्कम त्यांच्या उपयोगी येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल. या योजनेअंतर्गत काही कालावधीने अधूनमधून मनीबॅकचाही लाभ मिळतो. या योजनेमुळे तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा भार उचलू शकता. शिवाय या योजनेत करावी लागणारी गुंतवणूकदेखील फारशी नसल्याने तुमच्यावर मोठा आर्थिक भारदेखील येणार नाही.
पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजने’त दररोज ९५ रुपये म्हणजेच दर महा २८३० रुपयांची गुंतवणूक करून २० वर्षांच्या कालावधीत जवळपास १४ लाख रुपये मिळवू शकता. पोस्ट ऑफिसचा हा एक एंडोव्हमेंट प्लॅन आहे. या योजनेचा कालावधी १५ – २० वर्षांचा असतो. जर एखादी व्यक्ती जिने ही योजना किंवा पॉलिसी घेतली आहे ती योजनेचा कालावधी संपल्यानंतरदेखील जिवंत असेल तर तिलादेखील एकरकमी लाभ मिळतो. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर विम्याच्या रकमेबरोबरच बोनस रक्कमदेखील दिली जाते.
या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीच्या आधी ३ वेळा मनीबॅकचा लाभ मिळतो. म्हणजेच पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर कॅश बॅकच्या स्वरुपात एक रक्कम दिली जाते. या पैशांचा वापर करून कुटुंबाचे काही मोठे खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च याचा भार उचलता येतो. याच पद्धतीने आणखी दोन वेळा म्हणजे एकूण ३ वेळा मनीबॅकचा लाभ पॉलिसीधारकाला मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळेस बोनस रकमेसोबत बाकीची रक्कमदेखील मिळते. रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स स्कीमची सुरूवात भारत सरकारने १९९५ मध्ये केली होती.
समजा एखाद्या व्यक्तीने २५ वर्षांच्या वयात पॉलिसी घेतली. तर ७ लाख रुपये सम अश्युअर्डसोबत पॉलिसीचा पिरियड म्हणजे २० वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यत २८५३ रुपयांचा प्रिमियम येईल. म्हणजेच रोज ९५ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पॉलिसीच्या कालावधीत ८व्या, १२ व्या आणि १६व्या वर्षी सम अश्युअर्डच्या २० टक्के रक्कम म्हणजे १ लाख ४० हजार रुपये कॅशबॅक स्वरुपात मिळेल. या पद्धतीने एकूण ४ लाख २० हजार रुपये कॅशबॅक रुपाने मिळतील. तर उर्वरित २ लाख ८० हजार रुपयांसोबत ६,७२,००० रुपये बोनस रुपाने मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण जवळपास १४ लाख रुपये मिळतील.
या योजनेच्या अटी –
या योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो
या पॉलिसीसाठी किमान वय १९ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे इतके आहे.
पॉलिसी १५ किंवा २० वर्षांच्या कालावधीसाठी घेता येते. २० वर्षांची पॉलिसी घेण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.
या पॉलिसीमध्ये कमाल सम अश्युअर्ड २० लाख रुपये इतकी आहे.