मुंबई ः ५ जानेवारीला ईडीविरोधा शिवसेना रस्त्यावर उतरणार, असे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले होते. त्यावर शिवसेनेचं स्पष्टीकरण आलं आहे. त्यावर संजय राऊत म्हणतात की, “ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे तेव्हा उतरू. पण ह्या कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो”, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले.
या बातम्यांवरून भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत असं म्हटलं होतं की, “शिवसेना ईडी ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणसाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?”, अशाप्रकारचे ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनाला टोला लगावला होता.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि नंतर खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटीशीमुळे शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि खासगी गाड्यांमधून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.