मुंबई : राज्यात सन 2019 ची पोलीस भरती बहुतांश घटकांमध्ये पूर्ण झाली आहे. अधिकारी वर्गाची संख्या मुबलक असून कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी राज्यात लवकरच 7 हजार 231 पोलिसांची भरती होणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहमंत्री बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “राज्यातील 87 पोलीस स्टेशनचे बांधकाम होणार आहे. पोलिसांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठीही तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 394 पोलीस अधिकारी, कर्माचा-यांना सानुग्रह अनुदान मंजूर केले. पोक्सो सारखी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 25 जलदगती न्यायालये कार्यान्वित झाली आहेत. होमगार्डला वर्षभरात 120 ते 150 दिवस काम मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने काम केले आहे.
कोरोना काळात पोलिसांनी मोठी कामगिरी केली पण त्याचं कौतुक नाही केलं, अशी कोपरखळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मारली. प्रत्येक शिपाई निवृत्त होताना उपनिरीक्षक झालेला असेल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने निर्णय घेतले आहेत. शक्ती विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेले आहे.
आंदोलनादरम्यान 188 नुसार जे गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी स्तरावरून प्रस्ताव आल्यानंतर त्यावर काम केले जाणार आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
पेपर फुटीसंदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. 20 आरोपींना आतापर्यंत अटक केली असून सहा आरोपींना अटक करणे बाकी आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत, म्हाडा परीक्षा प्रकरणात देखील गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. टीईटी परीक्षे संदर्भात देखील गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.
नवाब मालिकांचा राजीनामा घेण्याच्या विरोधकांनी केलेल्या मागणीवर गृहमंत्री म्हणाले, “1993 च्या बॉम्ब स्फोट प्रकरणात अनेकांना शिक्षा झाली. त्यानंतर 3 मार्च 2022 रोजी एक गुन्हा दाखल झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 125 तासाचे स्टिंग ऑपरेशनचे फुटेज आहे. ते काही सगळे नाही, त्यांनी काही फुटेज राखून ठेवले आहे. जसजशी गरज लागेल तसे ते पुरावे बाहेर काढतील, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी कुणाचीही पाठराखण करणार नाही. ते प्रकरण आपल्याला तपासावे लागेल. याच्या पाठीमागे कोण आहे. ही घटना कशी पुढे घेऊन जायची, त्यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरवले जाईल.
देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा पेन ड्राईव्ह दिला. फडणवीस यांनी डिटेक्टीव एजन्सी काढली का, असा मिश्कील सवाल देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्ह मधील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे. तो सरकारने स्वीकारला आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे.
अन्यायाच्या विरोधात भूमिका घेतल्याने नवाब मालिकांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. जर भाजपकडे मालिकांच्या विरोधात पुरावे होते तर त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई का केली नाही. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके का ठेवली याची माहिती अजूनही समोर आली नाही. एनआयएच्या तपासात अद्याप काहीही उघड झालेलं नाही.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले. फोन टॅप करताना अनेकांची नावे बदलली. त्यामध्ये नाना पटोले यांचे नाव अमजद खान, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव परवेज सुतार, आशिष देशमुख यांचे नाव हीना महेश साळुंके असे ठेवण्यात आले. केंद्रीय यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे. केंद्रीय यंत्रणांचा प्रवक्ता बसवला आहे का असा खोचक सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला. एखादी तरी संस्था आपण सगळे मिळून सुरक्षित ठेऊयात, असेही वळसे पाटील म्हणाले.