पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली येथे शहरातील सर्वात मोठे अर्थात ८५० बेड्सचे मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये चिखलीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. माजी महापौर राहुल जाधव यांनी प्रस्तावाचे सूचक आहेत. तसेच, नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावे आणि पिंपरी-चिंचवडमधील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी पर्यायी रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला होता. त्यापार्श्वभूमीवर मौजे चिखली, ता. हवेली येथील ग. नं. १६५३ सुमारे २०.२२ हेक्टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळावा. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यापैकी सुमारे २ हेक्टर जागेवर प्रशस्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
शासकीय वैद्यकीय महविद्यालायचेही नियोजन…
वायसीएम रुग्णालयात मनुष्यबळ उपलब् व्हावे आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा. या हेतुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यतात आले आहेत. त्याच धर्तीवर चिखलीत होणाऱ्या प्रस्तावीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि अन्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत. या हेतुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आमदार लांडगे आग्रही आहेत. तसेच, या महाविद्यालयामध्ये नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक असे अभ्यासक्रम शिकवले जणार आहेत.
रुग्णालय होईल उत्तर पुणे जिल्ह्याचा केंद्रबिंदू…
सध्यस्थितीला यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयावर पुणे जिल्ह्यातील रुग्णांचा ओढा आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव सह मावळ तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. वायसीएममधील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेतील मर्यादा पाहता पिंपरी-चिंचवडसाठी पर्यायी आरोग्य व्यवस्था उभी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चिखलीमध्ये होणारे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे उत्तर पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा केंद्र बिंदू ठरणार आहे.