नवी दिल्ली : केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 68 शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,877 चार्जिंग केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, या टप्प्यात मंत्रालयाने, देशातील 16 राष्ट्रीय महामार्ग आणि 9 द्रुतगती महामार्गांवर 1,576 चार्जिंग केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे.
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या चार्जिंग केंद्रांची संख्या आणि ज्या शहरांमध्ये ही सुविधा उभारण्यात आली आहे त्यांचा तपशील परिशिष्ट 1 मध्ये दिला आहे.
केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर 25 किलोमीटरवर किमान एक चार्जिंग केंद्र आणि लांब पल्ल्याच्या किंवा अधिक अवजड प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर 100 किलोमीटरवर किमान एक च्राजिंग केंद्र उभारले जाईल. कोणत्याही शहरात 3 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर किमान एक चार्जिंग केंद्र असणे अपेक्षित आहे.
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या चार्जिग केंद्रांपैकी महाराष्ट्रात 317 केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहरासाठी 229, नाशिक शहरासाठी 25, नागपूरसाठी 38 तर ठाणे शहरासाठी 25 चार्जिंग केंद्रे उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागपूर शहरात यापैकी 4 चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
फेम इंडिया योजनेच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने सुमारे 43 कोटी रुपये खर्चाच्या 520 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीला परवानगी दिली होती.
तसेच वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीत फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत चार्जिंगबाबतच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री किशन पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.