पुढच्या अडीच वर्षात शिवसेना राहणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

0

जळगाव : मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (दि. 20) जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते.

आजची गर्दी पाहून वाटले की, आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. कालचे निकाल पाहून कळले की, फक्त अडीच महिन्यांत आम्हाला कामाची पोचपावती मिळाली. तुमच्या सर्वांमुळे हे यश मिळाले. पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नसल्याचा टोलाही ना. शिंदे यांनी लगावला.

मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेतही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला. ते म्हणाले, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आपला पक्ष संपवत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटीलदेखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेलो, ती चूक सुधारा असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.