या लोकांचं घरी जाऊन केले जाणार लसीकरण

0

जालना : राज्यात यापुढे जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं

घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या या मोहिमेचा लाभ सर्वांना मिळणार नाही. जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. जे शारीरिक व्याधीमुळे घराबाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांच्या कुटुंबानी लेखी लिहून देणं बंधनकारक आहे. तसेच फॅमिली डॉक्टरचे सर्टिफिकेटही देणे गरजेचे असणार आहे. तरच घरी येऊन लस दिली जाणार आहे, असं टोपे म्हणाले. घरी जाऊन लसीकरण करण्याचं हे काम टास्क फोर्सला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, लस खरेदीसाठी ठाकरे सरकारने सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतल्याने सरकारने हे सात हजार कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी वापरावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर टोपे यांनी पलटवार केला आहे. सात हजार कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. शेतकऱ्यांची आम्ही नेहमी काळजी घेत आलो आहोत. राज्य शासन जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.