पिंपरी : सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानातून दुकानदाराच्या हातातून सोन्याची साखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची चेन आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
राजू विश्वेश्वर मसकेरी (42, रा. शास्त्री नगर, डोंबिवली वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. परेश प्रकाश खंडेलवाल (35, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याबाबात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास खंडेलवाल यांच्या सराफी दुकानात आरोपी राजू सोन्याची साखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याला फिर्यादी खंडेलवाल सोन्याची साखळी दाखवत असताना त्याने खंडेलवाल यांच्या हातातील 56 हजार 250 रुपये किमतीची 12.4 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावली आणि पळून गेला.
या गुन्ह्याचा तपास करत असताना भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, सोन्याची चेन चोरणारा चोर एका सराफाच्या दुकानात विना पावती सोन्याची चेन विकण्यासाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित सराफाच्या दुकानात जाऊन राजू याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे चेन पोलिसांनी हस्तगत केली.
या चोरट्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे देखील अशा प्रकारच्या चो-या केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. आरोपी राजू याच्याकडून सोन्याची चेन, तीन मोबाईल फोन, असा एकूण एक लाख 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, प्रशांत साबळे, पोलीस अंमलदार बोयणे, अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले यांनी केली आहे.