पिंपरी : केवळ हॉस्पिटल आणि क्लिनिक मध्येच चोऱ्या करणाऱ्या एका चोराला वाकड पोलीसांनी मोठ्या शिताफिने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याकडुन ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे एकुण ७ लॅपटॉप आणि ३५ मोबाईल फोन जप्त करुन ७ गुन्हे उघडकिस आणले आहेत.
विकास संजय हगवणे (३० वर्ष, रा. भुकुम ग्राम पंचायत समोर, भुकुम, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता.९) मे २०२२ रोजी सायंकाळी पावने सहा वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयासमोर असलेल्या मिरा क्लिनीक मधील धनश्री डेंटल अँण्ड इम्प्लांट क्लिनिक मधुन कोणीतरी अज्ञात इसमाने लॅपटॉप चोरी केली असल्याची घटना घडली होती. पोलीसांनी क्लिनीक परीसरातील आजुबाजुचे सीसीटिव्ही फूटेज तपासले असता एक अनोळखी इसम हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्याच्या बहाण्याने आत प्रवेश करुन स्टॉफ चे लक्ष नसल्याचे पाहुन लॅपटॉप चोरी करुन जात असल्याचे दिसुन आला. त्यानंतर पुन्हा नऊ दिवसांनी म्हणजे (ता.१८) मे रोजी कस्पटे वस्ती येथील हॅपी क्लिनीक बाजुला असलेल्या आय.टि.व्ह्यू. ट्रेनींग इन्स्टिट्युट अशाच प्रकारे लॅपटॉप चोरीची घटना घडली. पुन्हा सात दिवसाने म्हणजे (ता.२५) मे रोजी वाकड डांगे चौक येथील स्पंदन हॉस्पिटल मध्ये चोरट्याने एक मोबाईल फोन चोरी केल्याची घटना घडली. वारंवार हॉस्पिटल आणि क्लिनिक मध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलीसांपुढे चोराला पकडण्याचे आव्हान उभे राहिले.
पोलीसांनी घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परीसरातील १०० पेक्षा अधिक सीसी टिव्ही फूटेजची पाहणी केली. चोरट्याचा पुर्व इतिहास नसल्याने पोलीसांना नुसत्या चेहऱ्यावरुन माहिती प्राप्त होत नव्हती. तरी देखील पोलीसांनी परीसरातील छोट्या मोठ्या हॉस्पिटल, क्लिनीक तसेच लॅपटॉप, मोबाईल विक्री व दुरुस्ती करणारे दुकानदार यांना जागृत केले.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मंगळवार (ता.२१) जून रोजी तपास पथकातील सहायक पोलीस फौजदार इनामदार यांना माहिती मिळाली की, सदर वर्णनाचा मिळता जुळता इसम हा वाकड रोड वरील एका लॅपटॉप विक्री आणि दुरुस्तीच्या दुकानात लॅपटॉप विक्री करण्यासाठी आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तत्काळ वाकड पोलीस लॅपटॉपच्या दुकानावर पोहचले आणि त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील लॅपटॉपबाबत चौकशी केली असता तो लॅपटॉप चोरीचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलीसांनी त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. शनिवार (ता.२५) जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सुरु आहे.
बनावट बील बुक चा करीत होता वापर
आरोपी विकास हगवणे हा चोरी केलेला लॅपटॉप, मोबाईल स्वतःचा असल्याचे सांगत तो दुकानदारांना पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील विघ्नहर्ता मोबाईल शॉपी नावाच्या बील पुस्तक दाखवित असे. या बनावट बीलाचा वापर करुन तो चोरलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांची विक्री दुकानदारांना करीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटल व क्लिनीक मधुन अनेक लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरी करुन विक्री केली असल्याची माहिती आरोपी विकास हगवणे याने वाकड पोलीसांना दिली आहे. वाकड, पिंपरी, भोसरी, चतुःश्रुंगी, कोथरुड अशा पोलीस ठाण्यात मिळुन चोरीचे एकुण ७ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सत्यवान माने, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदु गिरे, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिश शेख, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे, कौतेय खराडे, अजय फल्ले, परिमंडळ २ चे पोलीस उप-निरीक्षक पवार यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.