पुणे : महिलांचे गाऊन घालून आलेल्या तीन चोरट्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौकातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीनचा चोरून नेले. या एटीएम मशीनमध्ये रोख 19 लाख 50 हजार रुपये होते. 25 डिसेंबर रोजी पहाटे च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी स्टेट बँकेचे कर्मचारी इराप्पा चंदापा इरेकरी (वय 31) यांनी तक्रार दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिक्रापूरातील पाबळ रोडवर स्टेट बँकेचे हे एटीएम सेंटर होते. 25 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतीन तीन चोरटे आले. त्यांनी एटीएम मशीनभोवती दोर गुंडाळला आणि स्कॉर्पिओ गाडीने ओढून संपूर्ण मशीन चोरून नेले. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.