पिंपरी : वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी हिंजवडी पोलिसांनी केली आहे.
असिफ शेरखान पठाण (21, रा.मुळशी, मुळ गाव मोहोळ, सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा शोध हिंजवडी पोलीस घेत असताना त्यांना रामनगर, बावधन परिसरात एक इसम संशयीत रित्या फिरताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने परिसरात वाहनचोरीसाठी आल्याचे त्याने सांगितले.
त्याला अटक करून पोलिसांनी तपास केला असता त्याच्यावरील हिंजवडी पोलीस ठाणे येथील 2, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 2, सिंहगड पोलीस ठाण्यातील 2, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 2,वारजे पोलीस ठाण्यातील 2 तर दत्तवाडी कोथरूड,चंदननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 13 गुन्हे उघड झाले आहेत. तर 2 दुचाकीची कोणतीही तक्रार अद्याप पोलिसांकडे नाही. असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पठाणचे दोन साथीदार नितीन पांढुरंग साबळे व अनिकेत अमर ढगे हे फरार असून यातील ढगे याच्यावर 2017 मध्ये मोका अतंर्गत बिबेवाडी पोलिसांनी कारवाई केली होती.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सोन्याबापू देशमुख, सुनील दहिफळे, तपासी पथकाचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, किरण पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.