भाजपला तिसरा झटका ; तुषार कामठे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपची गळती सुरुच आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळेनिलखचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कामठे यांनी आज (गुरुवारी) भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

चिंचवड ऑटो क्लस्टर येथे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. आमदारांच्या हुकूमशाहीमुळे राजीनामा देत आहे. अत्यंत चुकिच्या पद्धतीने यांनी कामे केली आणि महापालिका लुटली, असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत तुषार कामठे हे भाजपकडून पिंपळेनिलखमधून निवडून आले होते. मागील पाच वर्षात भाजपने त्यांना एकही पद दिले नाही. कामठे यांनी विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आवाज उठविला होता. महापालिकेती भाजपाच्या चुकिच्या कामांविरोधात नेहमी आक्रमकपणे बोलत होते. कामठे यांनी आज भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. कामठे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आठवड्यापूर्वी राजीनामा देऊन सुरुवात केली. त्यानंतर पिंपळेगुरवच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही दोनच दिवसांपर्वी भाजपाला रामराम केला. आता पिंपळेनिलखचे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपमधील राजीनामा सत्र काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.