नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात सध्या भेटीगाठी वाढल्या आहेत. कालच पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दुसऱ्यांदा किशोर यांनी भेट घेतली. यावरून राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असतानाच आजही प्रशांत किशोर हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. भेटीमुळे राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी मुबंईत शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यांनतर सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. आणि आज देखील पवार यांच्या निवासस्थानी किशोर यांची तिसरी भेट आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत केल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्यासंदर्भात कालच चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान, काल शरद पवार यांच्या घरी झालेल्या अडीच तास बैठकीमध्ये काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नसल्याचं स्पष्टीकरण ‘राष्ट्र मंच’ने दिलं. त्यामुळे या झालेल्या बहुचर्चित बैठकीनंतर महाआघाडीची शक्यता तूर्त तरी संपुष्टात आली. तसेच आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून शरद पवार भाजपला धोबीपछाड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान आज (बुधवारी) पुन्हा एकदा निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर व शरद पवार यांच्यात भेट होत असल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.