पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन जोरात सुरू आहे. येथून देशात आणि देशाबाहेर दररोज लक्षावधी लसी जात आहेत. त्यामुळे ‘सीरम’मधील आगीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. केंद्रीय गृहमंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या घटनेची तातडीने चौकशी करण्यात आली. मात्र, कोरोना लस उत्पादनाला आगीची कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आग लागली असतानाच दुपारी ३ वाजता पहिला स्फोट झाला. दुसरा स्फोट ३ वाजून २५ मिनिटांनी झाला. पाठोपाठ तिसरा स्फोट झाल्याचा आवाज आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या इमारतीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते. आग प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.
मांजरी गावाजवळच्या एसईझेडमध्ये सीरम इन्स्टिट्यूटचा प्रकल्प आहे. तेथे काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. काही कामगार इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.