मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सध्या हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशिची लढत रंगताना दिसत आहे.
आपले आमदार फुटू नयेत म्हणून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. मंगळवार, दि. ७ जून रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांना एकत्र ठेवण्यामागचं कारण काय; याबाबतचा खुलासा पत्रकारांशी बोलताना केला.
“देशभरात सगळ्याच पक्षाचे आमदार निवडणुकीच्या वेळेला एकत्र येत असतात. त्याचप्रमाणे आता शिवसेनेचेही आले आहेत. मतदानाला त्यांनी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र हे दऱ्या-खोऱ्यांचं असं मोठं राज्य असल्याने अनेक आमदार लांबून येत असतात. त्यांना मतदानासंदर्भात काही सूचना द्यायच्या असतात.
विधान परिषद आणि राज्य सभेच्या मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असून ती एक वेगळ्याप्रकारची प्रक्रिया असल्यामुळे आमदारांना त्यासंदर्भात मार्गदर्शन करायंचं असतं. म्हणून आम्ही आमदारांना एकत्र ठेवलं आहे.”, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.