हे आंदोलन तुकडे तुकडे गॅंगने हायजॅक केलंय
शेतकरी आंदोलनावर भाजपा नेत्या बबीता फोगट यांचं वादग्रस्त ट्विट
नवी दिल्ली ः ”आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट भाजपा नेते बबीता फोगट यांनी केले आहे.
मागीलअठरा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन छेडलेले आहे. सुरूवातीला अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. नंतर केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये चार बैठका झाल्या, त्यातून तोडगा निघाला नाही. नंतर शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारले. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत टीकाटिप्पणी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, चीन-पाकिस्तानचा शेतकरी आंदोलनामागे हात आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी आंदोलनात असा एक गट ज्यांनी तोडगा काढायचाच नाही, असे मत मांडले. आणि आता या संपूर्ण प्रकरणात कुस्तीपटू आणि २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेल्या बबीता फोगट यांनी उडी घेतलेली आहे.