हे भाषण फक्त ट्रेलर असून पिच्चर 2 एप्रिलला : राज ठाकरे

0

पुणे : ‘नको तिथे बोट लावायची सवय, हे फक्त भांडण लावायचं काम करतात’, अशा तिखट शब्दांत राज ठाकरे यांनी राज्यपालांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले, राज्यपालांना काही समज आहे का, जर अभ्यास नाही तर बोलता कशाला, रामदास स्वामींनी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे तरी पाहा, शिवाजी महाराजांनी कधीच म्हटले नाही की ते त्यांचे गुरू होते आणि समर्थ रामदासांनी सुद्धा असे काही नोंदवले नाही, पुण्यातील मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. दरवर्षी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडतो मात्र यंदा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्यांदाच पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले होते.

कार्यक्रमासाठी लोटलेला मनसैनिकांचा जनसागर पाहून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा सुरवातीलाच आवर्जून उल्लेख करत पडत्या काळात देखील माझा सैनिक माझ्याबरोबर राहिला असे म्हणत कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

दरम्यान वर्धापन दिनाच्या भाषणात त्यांनी कोविड, राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेले वक्तव्य, लतादीदी, बाबासाहेब पुरंदरे यांचा अखेरचा निरोप, निवडणुका, युक्रेन हल्ला, संजय राऊतांचा हल्लाबोल अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांचा यावेळी त्यांनी वेध घेत चांगलाच समाचार घेतला.

देशावरील कोविड संकटावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, कोविड संकटामुळे मी दोन वर्षात कुठेच भाषण दिले नाही. कोणी विचार केला नव्हता की आपण असे दिवस बघू. तो काळच कठीण होता म्हणजे स्पर्श करायला देखील आपण घाबरायचो, अगदी कोकिळा देखील कुहू कुहू सोडून कोविड – कोविड ओरडत होती, मात्र आता मला असं वाटतं, मी पंतप्रधान यांना पत्र लिहून कळवावं की वर्षातून 2 दिवस लॉकडाऊन लावा, असा यंत्रणेला मिश्किल टोला लगावत कोविड संकटाची ठाकरे यांनी पुन्हा आठवण करून दिली.

सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत, त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजतो आहे. या मुद्यालाच अनुसरून ठाकरे म्हणाले, निवडणुका लांब जाणार हे मी आधीच सांगितलं होत. निवडणुका आल्या की त्या चढायला लागतात, निवडणूक आली की ती वातावरणात दिसते. दरम्यान ओबीसी समाजाचं कारण पुढं केलं गेलं खरं पण यांना निवडणुका घ्याच्याच नव्हत्या, मात्र मुख्यमंत्री आजारी आहेत हे कारण आहे म्हणून निवडणुका पुढे केल्या हे खरं कारण आहे, असा मिश्किलपणे सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या  हालचालींवर क्षणात त्यांनी लक्ष वेधून घेतले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, सरकार आणि प्रशासक त्यांना त्यांच्या हातात ठेवायचं आहे त्यामुळे मला वाटतं निवडणुका दिवाळी नंतर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाषणात राज ठाकरे यांनी युक्रेन युद्धाचा संदर्भ घेत म्हणाले, युक्रेन सोडा आधी तुमच्या घरचं बघा, शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना नोकरी नाही, मुलांच्या शाळा बंद आहेत, लोकांना रिल्सचं वेड लागलं आहे याकडे लक्ष द्या असे म्हणत त्यांनी महत्त्वाच्या गरजांकडे लक्ष वेधून घेत सरकारला खडे बोल सुनावले.

दरम्यान, राज्यातील राजकारणाविषयी बोलताना मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले, राज्यांना सध्या राजकारणाचं वेड लागलं आहे. सत्ताधारी म्हणतात हे आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधक म्हणतात ते आम्हाला संपवायला निघाले मग उरल कोण? असा प्रश्न उपस्थित करत आजचं भाषण फक्त ट्रेलर असून पिच्चर 2 एप्रिलला गुढीपाडव्याला बघायला मिळेल असे सूचक वक्तव्य यावेळी राज ठाकरे यांनी केले.

भाषणाच्या वेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. किती बोलतो तू? बोलु द्या, पण आपण काय आणि कसं बोलतो हे महाराष्ट्राची पुढची पिढी बघते, ते काय शिकतील असे म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातून सारे आपल्याकडे येतात सरकारकडे जात नाहीत कारण त्यांना विश्वास आहे इथे आपलं काम होत. लोकं विश्वासाने येतात हीच आपली 16 वर्षातील कमाई आहे असे अभिमानाने सांगून मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवणार पण इतर लोकांसारखे आणि इतर पक्षांसारखी जात बघून नाही जेवणार. मला जात कळत नाही, ती मला समजत नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराजांची जयंती तारखेने करावी की तीथीने हा प्रश्न उद्भवतो पण आपले सारे सण आपण तिथीने साजरा करतो आणि राजांचा जन्मदिवस हा आमचा सण आहे म्हणून शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची असे ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.