पुणे : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली असून, पुण्यातील गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही दिमाखात होणार आहे. मिरवणूक मार्गाला अडथळा होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलावरील (लकडी पूल) मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोजण्यात आली असून, सदर उंची ही 21 फूट असल्याचे निर्दशनास आले.
पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांचे आकर्षक रथ मार्गक्रमण करीत असतात. मंडईतील टिळक पुतळा येथून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक सुरू होऊन ती लक्ष्मी रस्त्याने छत्रपती संभाजी महाराज पुलावरून विसर्जन घाटावर जात असते. यंदा छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रो ओव्हर ब्रिजमुळे विसर्जन रथाला उंचीची मर्यादा येणार आहे.
त्यामुळे मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांंच्या उपस्थितीत मोजण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त रमाकांत माने, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे सुनील रासने, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रशांत टिकार, श्री तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित यांच्यासह मेट्रोचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करून उंचीची मोजणी केली.
‘मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाची गणेशमूर्ती 14 फूट असून, विसर्जन रथावरची सजावट 25 फुटांपर्यंत जाते. परंतु, यंदाच्या वर्षी 18 फुटांवरील सजावट फोल्डिंगच्या स्वरूपात करण्यात येणार आहे. जेणेकरून पुलावरून जाताना अडथळा होणार नाही,’ असे नितीन पंडित यांनी सांगितले.