यंदा विजयस्तंभास मानवंदना प्रतिकात्मक पद्धतीने होणार
३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत १८ गावांमध्ये कलम १४४ लागू
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील पेरणे येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना करोना पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक पद्धत्तीने साजरा करण्यात येणार आहे. बाहेरच्या नागरिकांना कोरेगाव भीमा व परिसरातील १८ गावांमध्ये येण्यास ३० डिसेंबरपासून बंदी घातलेली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदीदेखील करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच कोरेगाव भीमा परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा आणि फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग्ज लावण्यासहा बंदी घालण्यात आली आहे. कामावर जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार आहे, मात्र ओळखपत्र दाखविणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर विजयस्तंभ परिसरातील १८ गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. स्थानिक व्यवहार सुरूच राहणार आहे. मात्र, पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती डाॅ. देशमुख यांनी सांगितली.
यंदाची विजयस्तंभाची मानवंदना साध्या पद्धत्तीने आणि प्रतिकात्मक पद्धतीतने व्हावी, असे शासनाने परिपत्रक काढले आहे. ३० डिसेंबरपासून २ जानेवारी सकाळपर्यंत बाहेरील व्यक्तींना बंदी घातलेली आहे, अशी माहिती डाॅ. देशमुख यांनी दिली.