मुंबई : मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी मागची २५ वर्षे केलं आज तेच नाकं मुरडत आहेत, आरोप करत आहेत अशी टीका शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
त्याआधी शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवाजी पार्क या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतलं. ठाकरे गटाकडून भाजपावर आणि शिंदे गटावर आमचीच कामं तुम्ही तुमची म्हणून दाखवत आहात आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावलं आहे अशी टीका होत असतानाच शिंदे गटानेही सणसणीत उत्तर दिलं आहे.
मुंबईकरांचा खड्ड्यात घालण्याचं काम कुणी केलं? मुंबईकरांचा विश्वासघात इतकी वर्षे कुणी केला? आज तेच लोक आमच्यावर आरोप करत आहेत. करोना काळातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे त्याची पोलखोल होण्यास सुरूवात झाली आहे. हा सगळा भ्रष्टाचार लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असंही किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईकरांच्या विकासाठी त्यांना पुढची किमान २५ वर्षे खड्डे मुक्त रस्त्यांवरून जाता यावं यासाठी आम्ही काम करतो आहोत असंही ते म्हणाले. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी यावर बोलू नये असाही टोला किरण पावसकर यांनी लगावला.
एक लक्षात घ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवला आहे. मुंबईतल्या कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणासाठी जर ते येत असतील तर श्रेयवादाची लढाई कशाला करता? मुंबईकरांचं हे भाग्य आहे. ज्यांना टीका करायची आहे त्यांना कुठे टीका करायची तेदेखील कळत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका असंही किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याच विकासकामांचं उद्घाटन करायला येत आहे असं ठाकरे गटाने म्हटलं होतं त्याबाबत विचारलं असता किरण पावसकर यांनी हे उत्तर दिलं.
जे आरोप करत आहेत त्यांच्या विचारांची उंची कमी आहे. उगाचच भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातल्या होर्डिंग्जचा आणि झेंड्यांचा मुद्दा काढला जातो आहे. मुंबईकरांना त्रास देण्यासाठी हे चाललं आहे असंही पावसकर यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधीमंडळात लागतं आहे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या विचारांपासून तुम्ही (उद्धव ठाकरे) दूर गेला आहात. आता जे तैलचित्र लावलं जातं आहे त्याचा अभिमान बाळगा त्यावरून राजकारण करू नका असंही किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी कर्तबगारी होती तशी तर त्यांच्या मुलाला दाखवता आलीच नाही. खरं तर ते मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय घ्यायला हवा होता. आता जर आम्ही ते तैलचित्र विधीमंडळात लावत असू तर उद्धव ठाकरेंनी त्यावरून राजकारण करू नये असंही किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.