पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील आंबळे गावात मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उत्खनन झाले आहे. तसेच पुण्यातील अनेक भागात क्रशर उद्योजकांकडून अवैध उत्खनन केले जात असल्याने भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांनी पुणे हरित लवाद येथे तक्रार दाखल केली. यातूनच त्यांच्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षणात वाढ करावी अशी मागणी भेगडे यांनी केली आहे. सुरक्षा वाढवावी अशी मागणी पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
भेगडे भाजपा पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष होते. तसेच भाजपा-सेना युती सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यात राज्यमंत्री राहिले आहेत. त्याचबरोबर नुकतीच भाजपाने त्यांच्यावर १६ लोकसभा मतदार संघांच्या दौऱ्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे त्यांचा राज्यभर दौरा होत असतो. दरम्यान, राज्याचे गृहमंत्रीपद भाजपाकडे असताना भेगडे यांना संरक्षण वाढवून मागण्याची वेळ का आली हा मात्र सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
भेगडे यांना त्यांच्या पूर्वीच्या मावळ या मतदार संघातील आंबळे गावात मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर पुण्यातील अनेक भागात क्रशर उद्योजकांकडून अवैध उत्खनन केले जात असल्याचे समजले. त्यामुळे भेगडे यांनी याबाबत पुणे हरित लवाद येथे अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात केस दाखल केली.
केस दाखल होताच हरित लवादाने संबंधित जमिनींची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. लवादाचे आदेश आल्यानंतर याची माहिती अवैध उत्खननन करणाऱ्यांना समजल्यावर त्यांच्याकडून या खड्ड्यांमध्ये पोकलेन-जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यासर्व बाबी पुन्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर भेगडे यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची स्वत: त्यांच्याकडून उपस्थित केली गेली आहे.
जिल्ह्यातील बांधकामांसाठी मोठ्याप्रमाणात क्रशर (बांधकामासाठी लागणारा सिमेंटचा समावेश असलेला कच्चा माल) सध्या वापरात येत आहे. क्रशर तयार करण्यासाठी दगड-मातीची गरज असल्याने अवैध उत्खनन केले जात असल्याने निसर्गाची हानी होत असून, भविष्यात हरित लवादाकडून कारवाई झाल्यास अवैध काम करणाऱ्यांच्या उद्योगावर त्याचा परिणाम होणार आहे.
गौण खनिज उत्खननाबाबत शासनाने अनेक निर्बंध घालून दिले आहेत. कोणत्या भागात किती प्रमाणात उत्खनन करायचे आणि त्याची रॉयल्टी शासनाला किती भरली जावी याचे नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र, शासनाचा महसूल बुडविण्याबरोबरच निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी अनेक पर्यावरणवाद्यांनी यापूर्वी शासनाकडे मागणी केली आहे.
पर्यावरणवादी कारवाईची मागणी करीत असतानाच माजी राज्यमंत्र्यांनी स्वत: हरित लवादात दाद मागितल्याने याप्रकरणाकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात आहे. परंतु, यातून जिवालाच धोका उत्पन्न झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे. मावळ बरोबरीनेच जिल्ह्यातील क्रशर व्यवसाय करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे यासर्व प्रकारानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वैमनस्यही उफाळून येण्याची शक्यता आला वर्तविली जात आहे.
संरक्षण वाढवून देण्याबाबत मागणी झाली आहे. एखाद्या व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्याबाबत आमची ‘संरक्षण समिती’ असून, त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीकडून लवकरच याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात येईल. आनंद भोईटे,
पोलीस उपायुक्त,
परिमंडळ दोन पिंपरी-चिंचवड