पिंपरी : घरगुती साहित्य घराबाहेर काढल्याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेला शिवीगाळ केली. तसचे जीवे मारण्याची व बलात्कार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.7) पिंपळे गुरव येथे दुपारी तीनच्या सुमारास घडला.
याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि.8) सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रोहन सुभाष चव्हाण (रा. दारुवाला पूल, पुणे), आकाश उर्फ सनी हेमराज बेलखेडे, वसीम अस्लम शेख, शिवम रामतिरत जैस्वाल, राहुल रवींद्र बाविस्कर आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसले. फिर्यादी यांच्या राहत्या घरातील सामान गोण्यांमध्ये भरुन टेरेसवर व जिन्यामध्ये ठेवत होते. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शेरेबाजी करुन बलात्कार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.