पिंपरी : अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करुन गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, 6.31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी (दि.17) दुपारी जाधववाडी, चिखली येथे ही कारवाई केली.
गॅस रिफिलिंग करणारा व जय मल्हार गॅस दुकान मालक इंद्रशेखर हनुमंतराव पंढारे (30, रा. डुडुळगाव, मोशी), चालक लक्ष्मण मोहनराव म्हेत्रे (23, उदगीर, लातूर) आणि साईनाथ मारुती शिरसेकर (19, रा. मोशी) असे अटक आरोपी यांची नावे आहेत. चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करुन गॅस चोरी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी (दि.17) दुपारी याठिकाणी छापा टाकून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 6.31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात सात हजार रोख रक्कम, 85 गॅस टाक्या, इतर साहित्य व दोन वाहने यांचा समावेश आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.