लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला आणिटँकरने अचानक पेट घेतला. आगीने रुद्र रूप धारण केले. द्रुतगती मार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर ही घटना घडली. आगीचे लोटपुलाखाली देखील पडले. दरम्यान पुलाखालून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे आगीचे लोट पडल्याने त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तरटँकर जवळ एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्येउपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे लोट पुलाखाली पडल्याने पुलाखाली पार्क केलेली वाहनेदेखील जळून खाक झाली आहेत.
या घटनेनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याआहेत. तसेच पुण्याकडे येणारी वाहतूक देखील काही काळ बंद करण्यात आली होती.