पुणे : ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे ठार झाले. हा अपघात पुणे -बारामती रस्त्यावर तरडोली गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा झाला.
अश्विनी श्रेणिक भंडारी (४८), मिलिंद श्रेणिक भंडारी (२४), कविता उदय शहा (६२, सर्व रा. सुभाष चौक, बारामती) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. तर बिंदिया सुनिल भंडारी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांचे कुटुंबीय एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. रात्री कार्यक्रम संपवून ते बारामतीला परत जात होते. यावेळी तरडोलीपासून पुढे आल्यानंतर ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने वेगात असलेल्या कारने ट्रॉलीला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातातील जखमींना पुण्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेने बारामतीत शोककळा पसरली आहे.