पुणे : फॅन्सी नंबर प्लेट असलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसास शिवीगाळ आणि मारहाण करणा-या तिघांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रशांत भगवान पोकळे (वय ३०, रा. बरंगनी मला, धायरी), रितेश सुरेश जाधव (वय ३०) आणि राहुल अशोक कुचे (वय १९, दोघेही रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) अशी त्यांची नावे आहे. या प्रकरणात, पोलिस शिपाई सुरेंद्र साहेबराव साबळे (वय २६) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना १४ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात घडली. फॅन्सी नंबर प्लेट असलेली चारचाकी घेऊन आरोपी कसबा पेठेतील कुंभारवेस चौक येथून गाडीतळच्या दिशेने निघाले होते. कुंभारवेस चौकात वाहतूक पोलिसांनी गाडी
थांबवण्याचा इशारा देऊनही आरोपींनी गाडी थांबविली नाही. याबाबतची माहिती त्यांनी वायरलेसवरून दिली. त्यानंतर, शाहीर अमर शेख चौकात नियमन करणा-या पोलिसांनी आरोपींची गाडी बाजूला घेतली. ‘आम्ही अतिरेकी आहोत का, चोर आहोत का?’ अशी विचारणा करत आरोपींनी फिर्यादिंना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अंतिम युक्तिवादानंतर कायद्यामधील कलम ३५३ मध्ये दुरुस्ती झाल्याने संबंधित खटला निकालाकरिता सहायक सत्र न्यायाधीश अमित खारकर यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. तेथे सरकारी वकील डी. एम. सोननीस यांनी बाजू मांडली.
पोलिस विश्वासार्ह साक्षीदार : सरकारपक्षाचा युक्तिवाद
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये, फिर्यादीसह ससून रुग्णालयाचे सीएमओ डॉ. तुषार तोंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिस साक्षीदार विश्वासार्ह साक्षीदार असून त्याची साक्ष ग्राह्य धरण्यात यावी, याबाबत सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले अॅड. क्षीरसागर यांनी न्यायालयाला दिले.