पालखी सोहळ्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी समन्वयक

0

पिंपरी : महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्याकरीता आयुक्त राजेश पाटील यांनी मुख्य समन्वक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे  यांची नियुक्ती केली आहे, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त सचिन ढोले यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दि.२१ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या  पालखीचे तर दि. २२ जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखींचे  आगमन होणार आहे. दि.२१ जून रोजी आकुर्डी येथे  जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या  पालखीचा  मुक्काम असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरात पालखींचे आगमन आणि मुक्कामाच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिका, पोलीस  यंत्रणा, वीज वितरण कंपनी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेतली. पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची  उपलब्धता  करून देताना सर्व आस्थापानांमध्ये समन्वय राहणे गरजेचे आहे. याकरिता  आयुक्त पाटील यांनी मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती केली  आहे. तसा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखी सोहळा ज्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे त्या संबधित क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन,  विद्युत, पाणीपुरवठा,  स्थापत्य तसेच आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली  पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे नियोजन करावे. पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ संबंधित क्षेत्रीय कार्यालये आणि विभागांमार्फत उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी पालखी सोहळा कालावधीत येणा-या भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या कामकाजाचे नियोजन समन्वय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन करावे असे आदेशात नमूद केले आहे.

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या  नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या  अधिकाऱ्यांसमवेत समन्वय करावा लागणार आहे. वॉकीटॉकी, कंट्रोल रूमचा वापर करून जलदगतीने संपर्क साधला जाणार आहे. सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने इन्सिडंट कमांडर म्हणून अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील करण्यात येणार आहे.   शहर अभियंता मकरंद निकम, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, बीआरटी व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदिप खोत, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, भांडारचे उपायुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. लक्ष्मण गोफणे, आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ.गणेश देशपांडे, प्रशासनचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे,   मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात, सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील  स्थापत्य, विद्युत, जलनि:सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान खात्यांचे  कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, प्रशांत पाटील, आबासाहेब ढवळे, विलास देसले, देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, अनिल राउत आदींचा नियंत्रण कामकाजात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने पालखी मुक्काम, विसावा आणि  मार्गावर विविध ठिकाणी  फिरती शौचालये,  महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी  टँकरची सोय करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती तसेच इतर नियोजनाच्या दृष्टीने मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोलरूम तसेच पालखी मार्गावर फिरत्या कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे देखरेख करण्यात येणार आहे.  महापालिकेच्या वतीने अग्नीशामन सेवा, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून प्रत्येक २०० मीटर अंतरावर अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याची प्रमुख कार्यकारिणी, देहू कॅन्टॉन्मेंट बोर्ड, आळंदी नगर परिषद, देहू नगर पंचायत, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आदी आस्थापनांसमवेत  समन्वय ठेऊन आषाढीवारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.