सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुल, 11 काडतुसे जप्त

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने आठ दिवसात सात आरोपींना शस्त्रा सह अटक केली आहे. पाच कारवायांमध्ये पोलिसांनी तीन पिस्तुले, 11 काडतुसे, सहा लोखंडी कोयते जप्त केले आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी तडीपार आरोपी गणेश रघुनाथ बनसोडे (25, रा. निगडी) याला अटक केली असून पथकाने त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिसांनी 26 नोव्हेंबर रोजी केली.

दुसऱ्या कारवाईमध्ये पथकाला खबर मिळाली की सराईत गुन्हेगार चांड्या हा मुंबईला जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलिसांनी 27 नोव्हेंबर रोजी देहुरोड पुणे येथे पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी सापळा रचून अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (28, रा.पिंपरी), याला अटक केले. चांड्या हा तडीपार असून तो फरार होता. वाकड व हिंजवडी परीसरात खून, खूनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी असे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याला अठक करून देहुरोड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

तिसऱ्या कारवाईमध्ये रिक्षा चलकाला काही लोक मारत असल्याची व्हिडीओ क्लीप 28 नोव्हेंबर रोजी व्हायरल झाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करत याप्रकरणी अर्जून हिरामन धांडे (18 रा.चिंचवड), सचिन संतोष गायकवाड (19 रा.चिंचवड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी 1 रिक्षा, 5 लोखंडी कोयते याच्यासह ताब्यात घेतले.

अशाच प्रकारे इन्स्टाग्राम वर Krishna.king_307 या प्रोफाईलवरून एका रिल्समध्ये हातात लोखंडी कोयता घेऊन बॅकग्राउंडला हिंदी गाणे वाजवून नागरिकांमध्ये भिती पसरविण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी कृष्ण सिराम पाल (19, रा.आकुर्डी) याला अटक केले. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तर 30 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी फरार असलेला सराईत तुषार उर्फ आप्पा सुभाष गोगावले (29, रा.वडगाव) याला 3 गावठी पिस्तूल, 11 काडतुसे,एक टोयोटा ग्लेझा कार (एमएच12 युजे 1558) असा एकूण 6 लाख 55 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपीवर दोन खून, 2 खूनाचे प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल होते. तो मोक्का अतंर्गत शिक्षा भोगत होता तो जामिनावर बाहेर आला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस अमंलदार हजरत पठाण, प्रविण तापकीर, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सोपान ठोकळे, गणेश मेदगे,सुनिल चौधरी, मयूर दळवी,शाम बाबा, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, शुभम कदम, राम मोहिते, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.