पुणे : प्रेम व्यक्त करणारा संदेश आणि शायरी लिहिलेली असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणा-या तरुणास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अरुणकुमार भगत (२२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी पिडीता घराकडे येत असताना आरोपीने तिच्याकडे बघून अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर तिच्या दिशेने आय लव यू तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाईलनंबर असलेली चिठ्ठी फेकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी पाहिले.
त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीतेची साक्ष तसेच त्यास पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी महत्त्वाची ठरली. तो पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. तळेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना पोलिस हवालदार नितीन पवार यांनी मदत केली.