पिंपरी : चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले.
त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.
काचेच्या बाटलीमध्ये काही प्रमाणात पेट्रोल टाकले जाते. दिव्याप्रमाणे त्याची वात बाहेर काढली जाते. ज्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकायचा असतो तिथे ती वात पेटवून बाटली फेकली जाते. बाटली फुटल्यावर स्फोट होतो. याला पेट्रोल बॉम्ब असे म्हणतात.