पिंपरी : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असणारे ‘स्काय डायनिंग’ हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ मालकावर आल्याचे दिसत आहे. कारण, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली असून, सर्व परवानग्या जोपर्यंत घेतल्या जात नाहीत तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील कासारसाई धरणाच्या शेजारी असलेल्या स्काय डायनिंग हॉटेलच्या मालकाने कुठलीच परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं आहे. जोपर्यंत परवानगी घेतली जाणार नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. या हॉटेलचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झालं होतं.
पुण्यातील कासारसाई धरणाच्या कडेला स्काय डायनिंग हॉटेल उभारण्यात आलं आहे. क्रेनच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या हॉटेलवर १२० – १५० फुटांवर उंच नेऊन तिथे १५-२० ग्राहक एकाच वेळी जेवण करू शकतील असं नियोजन करण्यात आलं आहे. जेवणाचा आस्वाद घेत तिथून ३६० डिग्रीचा परिसर पाहता येत होता. यामुळं हे हवेतील तरंगतं हॉटेल अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलं होतं. परंतु, आता ते बंद ठेवण्याची वेळ हॉटेलचे मालक आकाश जाधव यांच्यावर आली आहे.